सर्व शासकीय यंत्रणानी जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा निधी खर्चासाठी योग्य प्रस्ताव सादर करावेत -पालकमंत्री अमित देशमुख

0
704

लातूर, दि.30, अनिल कोकने

:- जिल्हा नियोजन समितीच्या जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 सर्वसाधारण योजनेअंतर्गत 275 कोटी तर विशेष घटक योजनेअंतर्गत 124 कोटी असा एकूण 419 कोटीचा निधी मंजूर असून सर्व शासकीय यंत्रणांनी निधी मागणीचे प्रस्ताव योग्य पद्धतीने सादर करावेत व मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकूर्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाने मुंबईच्या त्यांच्या शिखर संस्थेत ज्या पद्धतीने पाळीव प्राण्याच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन करण्यासाठी विद्युतदाहिनी ची व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीची व्यवस्था लातूर जिल्ह्यात करण्यासाठी जागेची पाहणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तसेच लातूर शहरातील जुन्या सहकारी दूध डेअरी च्या जागेत देवणी गोवंश संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
मत्स्यव्यवसाय विभागाने लातूर जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमता व त्या क्षमतेवर मत्स्योत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी चा आराखडा सादर करावा व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करावे अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी करून वन विभागाने नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या निधीतून केलेल्या कामाची माहिती सादर करावी असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागात रस्त्याची कामे दर्जात्मक करावीत व ही कामे किमान पाच वर्षे टिकली पाहिजेत यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. अशी कामे देताना काम करण्याची गुत्तेदार याची क्षमता बघितली गेली पाहिजे व चांगले काम करणाऱ्या गुत्तेदार यांनाच कामे दिली गेली पाहिजेत. जेणेकरून झालेल्या कामातून त्या त्या भागातील लोकांचे समाधान झाले पाहिजे व हीच आपली जबाबदारी असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे. शौचालय निर्माण करताना पुढील काळात शौचालयात योग्य ती स्वच्छता वेळोवेळी राखली गेली पाहिजे याबाबत ही दक्षता घ्यावी. मुला-मुलींसाठी वेगवेगळी शौचालयं असावीत असे पालकमंत्री देशमुख यांनी सूचित करून लातूर शहरात जिल्हा ग्रंथालयाची अद्ययावत इमारतीची उभारणी झाली पाहिजे यासाठी ग्रंथालय अधिकारी यांनी योग्य तो पाठपुरावा करून तात्काळ प्रस्ताव सादर करावा व यावर्षीच्या अखेरपर्यंत नवीन ग्रंथालयाची पायाभरणी होईल यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.
क्रीडा विभागाने जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर निधीतून जिल्ह्यात हॉलीबॉल, कुस्ती इत्यादी क्रीडा प्रकारासाठी क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. तसेच आंतर जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात. लातूर शहरात स्विमिंग पूल निर्माण करण्यासाठी जागेची पाहणी करावी. तसेच लातूर जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण होतील यासाठी खेळाडूंना पायाभूत सुविधा ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाला पाहिजेत असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून क्रीडा विभागाने यासाठी अधिक तत्परता दाखवावी असेही त्यांनी म्हंटले.
समाज कल्याण विभागाने बहुजन मुला मुली साठी शासनाकडून मंजूर असलेले प्रत्येकी 100 क्षमतेचे वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी महसूल प्रशासनाची संपर्क साधून जागेची पाहणी करावी. तसेच बहुजन समाजातील मुलांना वस्तीगृहचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी शंभर क्षमता असलेल्या दोन इमारती भाड्याने घेऊन वसतिगृहाची सुरुवात करावी अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. त्याप्रमाणेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या व दर्जेदार सोयीसुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.
वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या रोहित्रा पैकी किती रोहित्र नादुरूस्त आहे त्याची माहिती घेऊन ती रोहीत्र तात्काळ दुरुस्त करावीत अथवा त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवावे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाच्या नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घेतली पाहिजेत असेही त्यांनी सूचित केले.
तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या निधीतून योग्य व प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत व मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करावा असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल व आयुक्त मित्तल यांनी ही आपल्या सूचना मांडून अधिनस्त यंत्रणांकडून योग्य पद्धतीने व वेळेत काम पूर्ण करून घेण्यात येईल येईल असे सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी एम एस दुसिंग व सहाय्यक नियोजन अधिकारी रेड्डी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 सर्वसाधारण योजनेअंतर्गत विभाग निहाय झालेल्या खर्चाची तसेच त्या त्या विभागाची सन 2021-22 साठीचे मागणी ची माहिती बैठकीत सादर केली.
***********

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here