सम्राट अशोक यांच्या 2325 व्या जयंती निमित्ताने ” कविता ” सम्राट अशोक

0
551

सम्राट अशोक यांच्या 2325 व्या जयंती निमित्ताने ” कविता “
सम्राट अशोक ( कवि – कौशलचंद्र)
=========
हे सम्राट ! तू जगज्जेता, तू चक्रवर्ती, तू राजाधिराज, तू प्रियदर्शी, तू धम्मधर, तू देवांप्रिय राजा या जगासाठी…
जंबुद्विपाच्या साऱ्या आसमंतावर अधिराज्य गाजवण्यासाठी तू पेटून उठलास तूझ्या दैदिप्यमान किर्तीसाठी…
तू निरपराध अन् निष्पाप जीवांच्या मातृभूमीत झालास क्रुद्ध
अन् लढलेस जीवनातील एकमेव कलिंगचे अत्यंत क्रूर युद्ध…
पण राजसत्तेच्या धुंदीत सिंहासनावर आरूढ झालेल्या “चंडशोक” तुला दिसला नाही कलिगांच्या मातीत रुजलेला बुद्ध…
तू चौफेर उधळलास आपला घोडा कलिंगाच्या धगधगत्या श्र्वासांच्या शांत मातीत…
पण खवखवलेल्या निखाऱ्यावर आक्रंदित मनाच्या तळतळाटात काळीज भाजत होते छातीत…
गरजल्या तुझ्या तोफा श्र्वापदांपरी घनघोर, कलिंगाच्या युद्धभूमीत क्रूरपणे…
अन् तळपल्या तुझ्या तलवारी निरपराध जीवांच्या मानेवर अमानुष आणि निर्दयपणे…
कलिंगाच्या युद्धभूमीवर तू घडविलास भयंकर महासंगर, ज्वलंत हिंसा आणि रक्तपात…
अन् चिरडून टाकलेस निरपराध श्र्वासांची मने या क्षितिजावर माजवून प्रचंड उत्पात…
तेजाळले कलिंग सैनिकांच्या डोळ्यांत रणकंदन मातृभूमीच्या रक्षणासाठी…
अन् ते लढले प्राणपणाने कलिंगाचा ध्वज लहरत ठेवण्यासाठी…
तुटून पडलेल्या मगध सैन्यांनी उडवली दाणादाण कलिंग सैन्यांची अन् पडला रक्ताच्या थारोळ्यात कलिंगाचा मळा…
उडाला प्रचंड हाहाकार, महाप्रलय, वाहिले रक्ताचे पाट, पडला रक्त-प्रेतांचा सडा अन् माणुसकीला तडा…
एक लक्ष लोक- सैनिक मृत्युमुखी पडले, दीड लक्ष लोक- सैनिक कैद करण्यात आले…
युद्धानंतर असंख्य पटीने दुष्काळ, महामारी अन् साथीचे रोगाने अनेक लोक-सैन्य जीवास मुकले…
पण दुमदुमत होता विजयाचा उन्माद अन् प्रचंड विश्वास तूझ्या क्रुद्ध डोळ्यात आणि हिंसक मनोभूमिवर…
उन्मत्त आणि बेलगाम मनाच्या धुंदीत अन् विजयाच्या आवेशात तू निघालास जगज्जेता बनून युद्धभूमीवर…
उद्ध्वस्त आयुष्य काळजात साठवून वेदनेच्या धगधगत्या आक्रोशात शहिदांच्या प्रेतांवर पडून विधवांनी फोडलेला टाहो…
रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या बापाच्या प्रेतांवर पडून रडणाऱ्या पुत्रांची आर्त हाक, आकांत अन् फोडलेला टाहो…
काळजाला भोकं पडली तूझ्या, हा मंजर बघून; अन् पिरगळून टाकले तूझ्या क्रुरतेचे नरडे ह्या रणसंग्रामाने…
पच्छातापदग्ध होवून तू भिरभिरत राहिलास चौफेर, रक्तलांच्छित वेदनांचा आक्रोश अन् मायलेकांचा आकांत ऐकून शुन्यात निःशब्दपणे…
मनात विजयाचा आनंदोत्सव घेवुन तू युद्धभूमीवर आलास अन् डोळ्यात आसवांचा महापूर घेवुन परतलास मगध साम्राज्यात हृदयात प्राणांतिक महावेदनेचा आगडोंब पेटत असतांना तू ऐकलांस निग्रोधाच्या मुखातून निनादलेला गजर ” बुद्ध शरणं गच्छामी”
तू घेतलीस बौद्ध धम्मदीक्षा आचार्य मोग्गलीपुत्र तिस्स यांचेकडून आणि जगलास धम्मसाधक बनून आयुष्याच्या अंतापर्यंत…
अन् करीत राहिलास धम्म कर्तव्य … धम्मघोष, धम्मयात्रा, धम्मविजय, धम्मानुग्रह, धम्मदान, धम्ममंगल, धम्मकार्य, धम्मपालन, धम्माचरण, धम्मविधान आणि धम्मनुशासन…
अखेरच्या श्वासापर्यंत…
हे धम्मनायका!
“धम्मतत्वाचा प्रसार आणि धम्मप्रचार” करण्यासाठी तू झालास “धम्माशोक” अन् केलास जनकल्याणासाठी धम्म चिंतन आणि धम्म चर्चा – धम्मदेशना …
” बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकांनुकंपाय ”
📝© कौशलचंद्र
( डॉ. चंद्रशेखर बांबोळे )
Mob. 8007748670

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here